पुणे: ऊस उत्पादकांच्या थकीत रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) प्रकरणी साखर आयुक्तालयाने २९ साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी आज (१३ एप्रिल) सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांकडून या नियमाचे उल्लंघन होत असून, देयकात टाळाटाळ होत आहे. थकीत एफआरपीप्रश्नी साखर आयुक्त कार्यालय या कारखान्यांवर नेमकी काय कारवाई करणार ? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नियमानुसार विलंब झाल्यास थकीत रकमेवर १५ टक्के व्याज आकारले जाते. तसेच आवश्यकतेनुसार महसुली वसुली प्रमाणपत्राद्वारे (आरआरसी) वसुलीची कारवाई होऊ शकते. दरम्यान, ५३ कारखान्यांनी ८० टक्क्यांहून कमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. त्यापैकी २४ कारखान्यांची सुनावणी पूर्ण झाली असून उर्वरित २९ कारखान्यांविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे. सुनावणीदरम्यान संबंधित कारखान्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. नोटीसनंतर काही रक्कम जमा केली आहे का, याचाही आढावा घेतला जाणार आहे.


















