कोल्हापूर : हलकर्णी येथील अथर्व – दौलत सहकारी साखर कारखान्यातील थकीत वेतन तसेच हंगामी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने कामगारांनी तहसील कार्यालयासमोर दोन तारखेपासून उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र, आता कामगारांनी थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती चंदगड तालुका साखर कामगार युनियनने निवेदनातून दिली आहे. सायंकाळी कामगार आयुक्त विशाल घाटगे यांनी कामगार संघटनेचे नेते कॉ. उदय नारकर, विजय देवणे यांच्यासह संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली.
गुरुवारी (ता. १६) कोल्हापूर येथे कामगार आयुक्तांच्या कार्यालयात संघटनेचे नेते प्रतिनिधी व अथर्व प्रशासनाचे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित झाले आहे. कामगारांच्या वेतनाबाबत त्रिपक्षीय करारानुसार निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. कामगारांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याचे जाहीर केले. विजय देवणे, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले. अशोक गावडे, चंद्रकांत केसरकर, निवृत्ती चौकुळकर, पांडुरंग रेडेकर, मल्लप्पा आतवाडकर, संजय राऊत व कृष्णा कांबळे हे कामगार प्रत्यक्ष उपोषणाला बसले होते, तर इतर सर्व कामगारांनी त्यांना पाठिंबा दिला होता.


















