कोल्हापूर : यंदा हवामान बदलामुळे पूर्वमोसमी पाऊस एप्रिलमध्येच आल्यामुळे या वर्षी तर हुमणीचे भुंगे आतापासूनच दिसू लागले. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ऊस हे पीक घेतले जाते. उस पिकावर प्रामुख्याने आढळणाऱ्या २० किडींपैकी सुमारे ८ ते १० किडी विभागनिहाय नुकसानकारक आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर व सांगली भागांत हुमणी ही कीड सर्वात महत्वाची ठरू लागली आहे.
पूर्व मोसमी पावसाच्या काळामध्ये हुमणी किडीचे भुंगे बाहेर पडतात. त्यांच्या नियंत्रणासाठी लवकर उपाययोजना केल्यास प्रभावी ठरते. वळवाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडणाऱ्या हुमणीच्या भुंग्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन कडेगावच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धैर्यशील लाड, राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पीएच. डी. स्कॉलर ऋषिकेश बसुगडे, शुभम पाटील यांनी केले आहे.
कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, हुमणीचे भुंगे कडुलिंब, बाबुळ, बोर अशा झाडांवर आपली उपजीविका करतात. तर अळी ऊस, भूईमुग, मका, ज्वारी व सोयाबीन आदी पिकांच्या मुळावर उपजीविका करते. मातीमध्ये राहून विविध प्रकारे ऊस पिकाचे नुकसान करणारी हुमणी आणि साधारणपणे वळवाचा पाऊस पडल्यानंतर भुंगे जमिनीच्या बाहेर येऊन मिलन करतात. अळी पिकांच्या मुळ्या कुरतडते. परिणामी वनस्पतीचा पाणी व अपद्रव्ये पुरवठा खंडित होतो. पाने प्रथम पिवळी पडतात व नंतर संपूर्ण झाड सुकते. प्रादुर्भावग्रस्त ऊस हाताने ओवल्यास सहजरीत्या उपटून येतो.
किडीमुळे उसाच्या उगवणीत सुमारे ४० टक्क्यांपर्यंत, तर तीव्र प्रादुर्भावात १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. यासाठी यावर मशागत पद्धतीने नियंत्रण, पीक फेरपालट, सापळा पीक पद्धत वापरावी. तसेच प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. पहिल्या पावसानंतर संध्याकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत कडुलिंब, बाभूळ, बोर, बदाम, जांभूळ अशा झाडांच्या फांद्यांवर भुंगेरे जमा होतात. ते मारावेत. प्रौढ भुंगेरे प्रकाशाकडे सहज आकर्षित होतात. शेतात प्रति हेक्टर १ प्रकाश सापळा बसवावा. जैविक नियंत्रणासाठी मेटारायझिम ऍनिसोपली, विष्लेरिया बंसियाना या बुरशींचा आणि सूत्रकृमोंचा वापर प्रभावी ठरतो असे उपाय सुचविण्यात आले आहेत. याशिवाय रायासनिक औषधांचाही वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


















