सांगली : हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यातील साखर निर्मिती, विक्री, मोलॅसिस निर्मिती व विक्री आणि साखर गोदामामधील साखर साठ्याची वेळोवेळी मालतारण कर्ज देणाऱ्या बँकेकडून व संबंधित शासकीय विभागाकडून तपासणी होत असते. उसाचे गाळप, साखर व मोलॅसिस निर्मिती, मोलॅसिसचा डिस्टिलरीकडे झालेला उपयोग या सर्व बाबींचे परीक्षण करूनच कारखान्याचा साखर उतारा हा मानांकित संस्थेकडून प्रमाणित करून येतो. त्यामुळे साखर उतारा कमी दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारखान्याचा कारभार चोख असल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी दिले आहे.
किरण नायकवडी व केदार नायकवडी यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना शिवाजी पाटील म्हणाले की, कारखान्यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार नाही. कारखाना व्यवस्थापन प्रादेशिक सहसंचालकांसमोर (साखर) लेखा परीक्षकांच्या अहवालावर आपली बाजू मांडून त्यांच्या आक्षेपांचे निरसन करेल. साखर उद्योग हा आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत आहे, हे सर्वश्रुत आहे. कारखान्याने घेतलेले कर्ज हे ‘एफआरपी’ प्रमाणे ऊसदर देण्यासाठी, ऊस तोडणी, वाहतुकीची रक्कम व इतर देणी देण्यासाठी वापरलेले आहे. कारखान्याचे कर्जाचे हप्ते नियमित असून कोणताही हप्ता थकीत नाही. हुतात्मा कारखान्याचे नेहमीच उच्चांकी ऊस दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.


















