सांगली : श्रीपती शुगर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये प्रतिटन ३,३०० रुपये ऊस दर जाहीर केला आहे. त्यापैकी प्रतिटन ३,२५० रुपयांप्रमाणे ४ लाख ३९ हजार ४ टन ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर १४२ कोटी रुपये वेळेत वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे रक्कम बुधवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती प्रमाणित करून घ्यावीत, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
याबाबत कारखान्याचे सरव्यवस्थापक महेश जोशी यांनी सांगितले की, आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र लाड गळीत हंगामात जाहीर केल्याप्रमाणे, श्रीपती शुगर कारखान्याने आजपर्यंत परिसरातील उच्चांकी दर देण्याबरोबरच शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत अदा केली आहेत. सीमाभागातील अन्य साखर कारखाने जो ऊसदर देतील, त्यानुसार ऊसदर देण्यास ‘श्रीपती शुगर’ कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे.


















