सोलापूर : सध्या देशातील साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता आणि त्यातुलनेत मर्यादित ऊस क्षेत्र यामुळे ३६५ दिवसांचे व्याज भरून साखर कारखाने १०० दिवस चालत आहेत. त्यातून कारखान्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे. साखर कारखाने 300 दिवस चालावेत याकडे कारखाना व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोहम शिरगावकर यांनी व्यक्त केले. श्रीपुर येथे कर्मयोगी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना व डेक्कन शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साखर उद्योग मंथन’ कार्यशाळा झाली. यावेळी शिरगावकर बोलत होते.
सोहम शिरगावकर म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांनी साखर उद्योगात इथेनॉल धोरण आणले. इथेनॉल इंधनात मिसळण्यासाठी दोन टक्के परवानगी होती आता ती २० टक्क्यांपर्यंत गेली. साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले, साखर उद्योगामुळे २ लाख कर्मचारी तसेच १० लाख ऊस तोडणी मजुरांची रोजीरोटी चालते. ६० हजार कोटींच्या उलाढालीतून दरवर्षी ९ हजार कोटींचा शासनाला कर मिळतो. साखर विक्रीतून कारखान्यांना ३७०० रुपये मिळतात. खर्च वजाजाता टना मागे ३५० रुपये तोटा असून सर्व कारखान्यांना मिळून १७०० कोर्टीचा तोटा झाला आहे. यावेळी अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, उपाध्यक्ष कैलास खुळे, सहकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले.


















