चेन्नई : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार गतिमान झाला आहे. यांदरम्यान, तिरुप्पूर येथील एका जाहीर सभेत, टीव्हीके प्रमुख अभिनेता विजय यांनीसर्वसमावेशक कर्जमाफी योजना राबवून राज्यातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हे प्राधान्य असेल, अशी घोषणा केली. ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. जर ५ एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के कर्जमाफी मिळेल. विजय यांनी भात आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. एमएसएमई क्षेत्राला दिलासा देण्यासाठी त्यांनी पीक-अवरमधील वीज दर रद्द करण्याची आणि पाच वर्षांसाठी करमुक्त वीज देण्याची योजनाही जाहीर केली.
विजय यांनी सांगितले की, राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यास, ते शेतकऱ्यांना भातासाठी प्रति क्विंटल ३,५०० रुपये आणि उसासाठी प्रति टन ४,५०० रुपये पर्यंतची रक्कम मिळवून देतील. विणकरांसाठी कच्च्या मालावर ५० टक्के अनुदान आणि त्यांचे निवृत्तीवेतन ३,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा त्यांनी केली. याव्यतिरिक्त, त्यांनी १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याबद्दलही सांगितले. स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी राज्याचे स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विजय यांनी डीएमकेच्या कार्यकाळात अनेक एमएसएमई युनिट्स बंद पडल्याची टीका केली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, विजय यांनी १५,००० कोटी रुपयांचा राज्य हमी निधी तयार करण्याचे आश्वासन दिले.


















