सोलापूर: पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात आयोजित ‘साखर मंथन’ कार्यक्रमात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी आणि ‘ऊस संजीवनी’ महाराष्ट्रभर पोहोचवणारे कृषितज्ज्ञ संजीव माने यांनी मार्गदर्शन केले आणि ऊस उत्पादकता वाढीची सूत्रे सांगितली. तिटकारे यांनी साखर उद्योगापुढील आर्थिक संकट, जागतिक बाजारपेठेतील बदल आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सविस्तर सादरीकरण केले. तिटकारे यांनी राज्याच्या साखर उद्योगाचे विदारक आर्थिक चित्र मांडले.
ते म्हणाले की, साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. उसाच्या कमतरतेमुळे हंगाम आता केवळ १०० दिवसांवर आला आहे, ज्यामुळे कारखान्यांचे स्थिर खर्च वाढत आहेत. केवळ गाळप क्षमता वाढवण्याऐवजी तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी आपला अवाढव्य आणि अकुशल कर्मचारी वर्ग कमी करून ‘प्रोफेशनल’ होणे गरजेचे आहे. सहकारी कारखान्यांचे मनुष्यबळ पाहिले तर आपल्याकडे क्षमतेच्या तुलनेत ४ ते ५ पट जास्त कर्मचारी आहेत, ज्यातील ६५ टक्के कर्मचारी अकुशल आहेत, असे दिसते. अकुशल कामगारांना अर्ध-कुशल आणि त्यानंतर पूर्णपणे कुशल बनवण्यासाठी टार्गेट दिले पाहिजे. यावेळी जिवाजी मोहिते, समीर सलगर, देशमुख आदींनी आपली निरीक्षणे मांडली.


















