कोल्हापूर : देशाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशात सध्या महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत. उत्तर प्रदेशात नऊ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. तर तमिळनाडूत ११ कारखाने सुरू आहेत. गळीत हंगामात सहभागा घेतलेल्या ५४१ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखाने सुरू आहेत. १५ एप्रिलअखेर २७३ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात साखर उत्पाकदता २५४.३० लाख टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टनांनी साखर उत्पादन जादा झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा देशातील साखर उत्पादनात ७.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली.
देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा तब्बल ८६ टक्के इतका आहे. देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राचा एकट्याचा वाटा ९९.२० लाख टनांचा आहे. महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी असून, राज्याने यंदा १०० लाख टनांचा टप्पा गाठला आहे. २१० साखर कारखान्यांनी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत ९९.२० लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात याच कालावधीत ८०.६५ लाख टन साखर उत्पादित झाली होती. उत्तर प्रदेशने ८९.२० लाख टन आणि कर्नाटकने ४७.१५ लाख टन साखर उत्पादित केली. यंदा देशाचा सरासरी साखर उतारा ९.५६ टक्के इतका राहिला.


















