भवानीनगर : आगामी, गळीत हंगाम २०२६-२७ साठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत २० हजार १७० एकर उसाच्या क्षेत्राची नोंद झाली आहे. कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेत गाळप होण्यासाठी आवश्यक ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणेसाठी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दि. १९ पासून ऊसतोडणी वाहतूक करार करण्याचा प्रारंभ करण्यात आला. ऊस वाहतूक कंत्राटदार, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याशी संपर्क साधून वेळेत करार करावेत, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले.
कारखान्याचे अध्यक्ष जाचक यांनी सांगितले की, गेल्या हंगामात ७ लाख ५६ हजार २८५ टन उसाचे गाळप झाले होते. या हंगामात कारखान्याला सरासरी साखर उतारा ११.३६ टक्के मिळाला होता. हंगामात सातत्याने दैनंदिन ८ हजार टनांपेक्षा जास्तीचे ऊस गाळप करण्यात आले. प्लान्टमध्ये कुठेही जामिंग न लागता कमीत कमी स्टॉपेजेस झाले. येत्या गाळप हंगामात कार्यक्षेत्राबाहेरील उसाच्या नोंदी घेण्यात येत आहेत. यावेळी संचालक सतीश देवकाते, प्रशांत दराडे, नीलेश टिळेकर, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, कामगार नेते युवराज रणवरे, ऊसतोडणी वाहतूक संघटेनेचे अध्यक्ष विजय पाटील, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार अनिल निकम, दत्तात्रय चोरमले, गणेश भगत, शहाजी भगत आदी उपस्थित होते.


















