सोलापूर : जिल्ह्यातील २० कारखान्यांनी थकवली ३६० कोटींची एफआरपी, १५ कारखान्यांनी दिली ऊसबिले

सोलापूर : जिल्ह्यातील केवळ १५ साखर कारखान्यांनीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी अदा केली आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना, कारखानदारांकडून या नियमाची पायमल्ली होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हंगाम संपून दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. सद्यस्थितीत तब्बल २० साखर कारखान्यांकडे सुमारे ३६० कोटींची एफआरपी ऊसबिले थकीत आहेत. साखर कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीला २५०० ते ३०२५ रुपये प्रतीटन दर जाहीर केले होते. त्याचा विचार केल्यास जवळपास २९ कारखान्यांकडे सुमारे ८१७ कोटी रुपयांची ऊसबिले प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील केवळ सहा कारखान्यांनीच एफआरपीपेक्षा जादा जाहीर केलेल्या दरानुसार, ऊसबिले अदा केली आहेत. साखर आयुक्तालयाकडून ७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांची सुनावणी झाली. मात्र, ही कारवाई केवळ दिखाव्यापुरती असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांनी केला आहे. सुनावणीनंतर कारखान्यांकडून केवळ एफआरपीची टक्केवारी वाढविण्यावर भर दिला जात आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रत्येक साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील एफआरपी थकवलेल्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी २१ एप्रिल रोजी साखर आयुक्तांची भेट घेणार आहोत. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाले आहेत. आता आंदोलन केले जाईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here