कोल्हापूर : राज्यातील सर्व २१० खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर जिल्ह्याने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी १ कोटी २९ लाख ८७ हजार टनांचे गाळप करून १ कोटी ४६ लाख ४९ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. साखर उतारा सरासरी ११.२८ टक्के राखत कोल्हापूर जिल्ह्याने उत्पादनात मुसंडी मारली आहे. तर ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. जिल्ह्याने १ कोटी ५९ लाख ९३ हजार ७१३ टन उसाचे गाळप करत ८.८५ टक्के उतारा राखत १ कोटी ४१ लाख ५९ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
राज्यात यंदा १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे कोल्हापूर व पुणे जिल्हे यावेळी किंचित मागे पडले आहेत. गतवर्षीपेक्षा १ कोटी ९१ लाख २० हजार टनांनी यंदा गाळप वाढले आहे. तुलनेत साखर उताऱ्यात किंचितशी वाढ झाली असून, ऊस गाळपात मात्र यंदा सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.


















