नवी दिल्ली : केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) आगामी 2026–27 साखर हंगामासाठी एफआरपीमधे (FRP) प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ करून तो 365 रुपये प्रति क्विंटल करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने स्वागत केले आहे. ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, हा निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण समृद्धीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यांनी नमूद केले की, सुधारित एफआरपीमुळे देशातील सुमारे 5.5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. या वाढीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त 15,000 ते 20,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असून, एकूण ऊस देयके सुमारे 1.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे ग्रामीण मागणी वाढेल आणि विशेषतः ऊस उत्पादक भागातील कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
बल्लानी यांनी पुढे सांगितले की, उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्यानंतर साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) आणि इथेनॉल खरेदी दरातही तदनुरूप सुधारणा करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून साखर कारखान्यांपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. त्यांनी स्पष्ट केले की, एफआरपी वाढ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असली तरी त्यामुळे साखर कारखान्यांचा कच्चा माल खर्च वाढतो. त्यामुळे साखर MSP आणि इथेनॉल दरात प्रमाणानुसार वाढ केल्यास कारखान्यांना वाढीव खर्च पेलणे सोपे जाईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर देयके देणे शक्य होईल.याशिवाय, इथेनॉल वाटपात घट झाल्यामुळे उत्पादन क्षमता आणि देशांतर्गत मागणी यामध्ये तफावत निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. यामुळे उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आणि उद्योगावर आर्थिक ताण वाढत आहे.
ISMA ने सुचवले की, साखर आणि इथेनॉल दरांमध्ये वेळेवर सुधारणा, संतुलित इथेनॉल वाटप आणि E20 नंतर E22, E25, E27, E85/E100 अशा उच्च मिश्रणासाठी स्पष्ट रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. तसेच फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा (FFVs) प्रसार आणि जीएसटीमध्ये तर्कसंगत बदल करून इथेनॉलची मागणी वाढवता येईल. ISMA ने विश्वास व्यक्त केला की, सरकार या सूचनांवर गांभीर्याने विचार करेल आणि शेतकरी व साखर उद्योग या दोघांच्या हिताचे संतुलित निर्णय घेईल


















