सातारा : राज्य सरकारने यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारने गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला.
या निर्णयाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २९ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखरेचा साठा कमी होत असल्याने केंद्र सरकारच्या दबावातून गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले की, गळीत हंगाम लवकर सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेआधी होईल आणि त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. ऊस काही काळ शेतात राहिल्यास त्याच्या वजनासोबत साखर उताऱ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उद्योगातील एकूण परिस्थितीचा विचार करून सरकारने गळीत हंगामाची तारीख निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी तसेच साखर उद्योगात नाराजी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. गळीत हंगाम लवकर सुरू झाल्यास उसाची रिकव्हरी दीड टक्क्यापर्यंत घटू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ५०० रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ऊस शेतात आणखी काही दिवस राहिल्यास वजनात वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लवकर तोडण्याची घाई सरकार का करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
साखरेची किमान आधारभूत किंमत (MSP) पाच हजार रुपये करावी, तसेच इथेनॉलच्या दरात ७० रुपयांची वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी १० ऑक्टोबर रोजी ऊस परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















