कोल्हापूर : कारखानदारांची साखरेला ४१०० रुपये दर, एफआरपीसाठी ५०० रुपये अर्थसाहाय्य करण्याची मागणी

कोल्हापूर : साखरेला प्रतिक्विंटल किमान ४१०० रुपये दर मिळावा, उसाचा ज्यूस व सीरपपासून तयार केलेल्या इथेनॉलला प्रति लिटर ७२ रुपये आणि बी हेवी मोलॅसिससाठी प्रतिलिटर ६७ रुपये तत्काळ मिळवण्यासाठी राज्य शासनासह साखर कारखानदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने यंदा पुन्हा उसाच्या ‘एफआरपी’मध्ये वाढ केली आहे. मात्र, साखरेच्या किमान दरवाढीअभावी कारखान्यांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, साखर कारखानदारांनी ‘एमएसपी’ वाढीची मागणी केली आहे. तसेच कारखान्यांना ‘एफआरपी’साठी पंजाबच्या धर्तीवर अर्थसहाय्य देण्याचीही मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. राज्यातील साखर उद्योगातील आव्हानांचा अभ्यास करुन मार्ग काढण्यासाठी वित्त, कृषी, सहकार, पणन व उद्योग विभागांच्या अपर मुख्य सचिवांचा समावेश समिती तयार करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हंगाम सुरु होण्याआधी यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने साखरेचा प्रति क्विंटलचा किमान विक्री दर ३१०० रुपये ठेवला आहे. यामध्ये आता वाढ करणे अपेक्षित आहे. साखरेचा दर वाढल्यानंतर ग्राहकांना फटका बसेल, अशी सरकारची धारणा आहे. मात्र, उत्पादित होणारी २५ टक्के साखर केवळ घरगुती वापरासाठी घेतली जाते तर ७५ टक्के साखर ही महागडी शितपेय, मिठाई, औषधांसाठी वापरली जात असते. त्यानूसार साखरेचा किमान दर ४१०० रुपये करावी अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे. तसेच पंजाबच्या धर्तीवर एफ.आर.पी. प्रति टन ५०० रुपये अर्थसाहाय्य मिळावे, अशी मागणी होत आहे. याबाबत कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार चंद्रदीप नरके म्हणाले की, उसाच्या उत्पादन खर्चानुसार एफआरपी वाढवली जात आहे. हा चांगला निर्णय आहे. त्यानुसार उसाची एफआरपी आणि साखरेचा उत्पादन खर्च मिळून साखरेचा प्रति क्विंटलचा किमान ४५०० रुपये दर झाला पाहिजे. तरच, कारखाने अडचणीतून बाहेर येऊ शकतात.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here