कर्नाटक : ऊसदरातील तफावतीचा महाराष्ट्राला फायदा; बेळगाव जिल्ह्यातील ऊस सांगली-कोल्हापूरच्या कारखान्यांकडे वळला

बेळगाव : ऊसदरातील फरक आणि वेळेत ऊसबिल मिळण्याच्या आश्वासनामुळे कर्नाटकातील सीमावर्ती भागातील ऊस महाराष्ट्राकडे वळू लागला आहे. विशेषतः अथणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडे वाढत आहे. कर्नाटकातील कारखान्यांकडूनही चांगला दर दिला जात असला, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याबाबत निश्चितता नसल्याने शेतकरी महाराष्ट्रातील कारखान्यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.

यंदाच्या गळीत हंगामात ऊसदराच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनानंतर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊसदरातील तफावत शेतकऱ्यांच्या निर्णयावर परिणाम करत आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांनी पहिला हप्ता प्रतिटन ३,९०० रुपये, दुसरा हप्ता १०० रुपये आणि अंतिम हप्ता २०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, कर्नाटकातील कारखान्यांकडून पहिला हप्ता प्रतिटन ३,६०० ते ३,७५० रुपये दिला जात आहे. उर्वरित हप्त्यांबाबत घोषणा करण्यात आली असली, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांकडे ऊस पाठविण्याचे प्रमाण वाढत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

अथणी तालुक्याला महाराष्ट्राची सीमा लागून असल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने येथील शेतकऱ्यांसाठी सोयीचे पर्याय ठरत आहेत. अधिक ऊसदरासोबतच ऊस बिल वेळेत देण्याची हमी महाराष्ट्रातील कारखान्यांकडून दिली जात आहे. ऊसपुरवठ्यानंतर अवघ्या १५ दिवसांत बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शविली आहे. तसेच कोणतीही कपात न करता ऊस स्वीकारण्याच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊसतोडणी यंत्रणांचे प्रतिनिधी अथणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. अधिक ऊसदर, वेळेत बिल आणि योग्य ऊसतोडणी व्यवस्थेची हमी देत शेतकऱ्यांना ऊसपुरवठ्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गट महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊस पाठविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

अथणीबरोबरच कागवाड, रायबाग आणि जमखंडी परिसरातील ऊसही महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांकडे वळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्नाटकातील सीमावर्ती भागातील साखर कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे आव्हान निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, गाळप क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी कर्नाटकातील सीमावर्ती भाग महत्त्वाचा ठरत आहे.

‘जादा दर मिळेल तिकडे ऊस’ हेच शेतकऱ्यांचे धोरण!

पूर्वी साखर कारखान्यांमध्ये ऊस वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी स्पर्धा होत असे. मात्र, आता शेतकऱ्यांचा ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः अथणी तालुक्यातील शेतकरी प्रतिटन मिळणारा ऊसदर, बिल जमा होण्याचा कालावधी आणि वाहतूक खर्च या बाबींचा विचार करून कारखान्याची निवड करत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात सीमाभागात ‘जादा दर मिळेल तिकडे ऊस’ हे धोरण प्रभावी ठरत आहे.

एकीकडे कर्नाटकातील कारखान्यांसमोर स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस आपल्याकडेच टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कारखाने अधिक दर आणि वेळेत बिल देण्याच्या माध्यमातून सीमाभागातील ऊस मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात अथणीसह सीमावर्ती भागातील किती ऊस महाराष्ट्राकडे वळतो, यावर कर्नाटकातील कारखान्यांच्या गाळपाचे गणित अवलंबून राहणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here