पुणे : आळेफाटा पोलिसांनी पाच मुकादमांविरुद्ध ऊसतोडणी हंगामात मजुरांच्या नावाचा गैरवापर करून शेतकरी आणि कंत्राटदारांची १ कोटी २२ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. जुन्नर तालुक्यात हा कोट्यवधींच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेल्हे येथील शेतकरी विजय घोडके, सतिश हांडे, भास्कर हांडे, सुरेश औटी, ज्ञानदेव येवले यांसारख्या अनेक कष्टकऱ्यांचे लाखो रुपये यात अडकले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ज्ञानदेव तेजराव वाघ, जगन्नाथ रेवननाथ जायभाये, काकासाहेब बाबुराव आगळे, सुधाकर मुरलीधर वाघ आणि राजू लोभा चव्हाण या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेल्हे येथील शेतकरी विजय बाळासाहेब घोडके यांनी २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी मजुरांची मागणी केली असता, संशयितांनी त्यांच्याकडून कराराच्या नावाखाली घोडके आणि त्यांच्या मुलाकडून आरटीजीएस व धनादेशाद्वारे २६ लाख रुपये आगाऊ स्वरूपात उकळले. तपासादरम्यान ही फसवणूक केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून, परिसरातील १० हून अधिक शेतकरी व कंत्राटदारांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव आणि सहाय्यक निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


















