किसन वीर कारखान्याची आर्थिक स्थिती स्थिर; शेतकऱ्यांचे हित जपण्यावर भर : खासदार नितीन पाटील

सातारा : ‘किसन वीर’ साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची पूर्ण क्षमता कारखान्याकडे असल्याचा विश्वास कारखान्याचे संचालक, खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी आणि सभासदांच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार करून कारखाना सध्या अत्यंत काटकसरीने चालवला जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते. खासदार पाटील यांनी सांगितले की, विकास राष्ट्रीय सहकारी महामंडळ (NCDC) कडून मिळालेल्या निधीतून पूर्वीच्या संचालक मंडळाची, बँकांची तसेच शासकीय आणि व्यापारी देणी फेडण्याचे काम सुरू आहे. बहुतांश बँकांशी तडजोडीच्या माध्यमातून एकरकमी परतफेड करण्यात आली असून, आतापर्यंत नऊ बँका आणि पतसंस्थांची एकूण १७ कर्जखाती बंद करण्यात आली आहेत. उर्वरित दोन बँका आणि पतसंस्थांची देणीही लवकरच फेडली जातील, असे त्यांनी सांगितले.

कारखान्याला मिळालेल्या ४६७ कोटी रुपयांचा वापर केवळ थकीत देणी फेडण्यासाठीच करण्याची अट असल्यामुळे ही रक्कम दैनंदिन कामकाजासाठी वापरता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीदेखील जीएसटी, अन्य कर, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी आणि NCDC कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कामगारांचे बहुतांश महिन्यांचे वेतनही वेळेवर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मागील चार हंगामांमध्ये ‘किसन वीर’ आणि ‘किसन वीर खंडाळा’ हे दोन्ही कारखाने काटकसरीने चालवत शेतकऱ्यांचे ऊसबिल, तोडणी-वाहतूक खर्च आणि व्यापारी देणी वेळेवर चुकती करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ऊस पुरवठा कमी होत असल्यामुळे कारखाना सध्या फक्त १०० दिवस चालत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात ऊसाचे प्रमाण वाढल्यास आर्थिक अडचणींमधून लवकर बाहेर पडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ChiniMandi WhatsApp Channel

सध्या कारखाना तोट्यात असून मालमत्तेपेक्षा कर्ज अधिक असल्याने इतर बँका कर्ज देण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. साखरेचा मोठा साठा उपलब्ध असूनही तारणावर कर्ज मिळत नसल्यामुळे साखर विक्रीतूनच शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागत आहेत. केंद्र सरकारकडून साखर विक्रीचा कोटा आणि परवानगी उशिरा मिळाल्यामुळे एफआरपीची रक्कम वेळेत देता आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच विक्री परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची थकीत एफआरपी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढील तीन ते चार वर्षांत कारखान्याच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि इतर कारखान्यांच्या तुलनेत समान किंवा अधिक दर शेतकऱ्यांना देता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या कठीण काळात सभासदांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई भविष्यात निश्चितपणे केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here