सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची कारखान्याची प्रारूप मतदार यादी मागील महिन्यात ४ एप्रिलला निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ मे रोजी प्रसिद्ध झाली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसात निवडणूक जाहीर करण्यात येते. त्या सूत्रानुसार १४ मे पर्यंत पंचवार्षिक निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे जून महिन्यात कारखान्यासाठी मतदान होणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार रेठरे खुर्द येथील बापूसाहेब साळुंखे यांची एकमेव हरकत दाखल झाली होती. या दाखल हरकतीवर पुणे प्रादेशिक सहसंचालक विभागीय कार्यालयात सुनावणी झाली. साळुंखे यांनी रेठरे खुर्दमधील एका महिला मतदाराविरोधात आक्षेप नोंदवित पुरावे सादर केले होते. अन्य चार मतदारांविरोधातसुद्धा आक्षेप होता. कारखाना प्रशासनाने याबाबत आपली भूमिका सुनावणीवेळी स्पष्ट केली होती. त्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी साळुंखे यांच्या हरकतीवर निकाल जाहीर करण्यात आला. साळुंखे यांचा आक्षेप व त्यांनी दिलेले पुरावे ग्राह्य मानत रेठरे खुर्दमधील एका महिला मतदाराचे नाव वगळण्यात आले आहे. त्यानुसार, आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून येत्या आठवडाभरात निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते.


















