कोल्हापूर : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी एकात्मिक हुमणी नियंत्रण मोहिमेंतर्गत विविध उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. हुमणीच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकाश सापळे, कामगंध सापळे, मेटारिझियमद्वारे जैविक नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार रासायनिक औषधांचा वापर अशा विविध पद्धतींबाबत पांगरे यांनी सविस्तर माहिती दिली. ‘शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने या उपाययोजना राबवल्यास आगामी काळात हुमणीचा प्रादुर्भाव पूर्णतः नष्ट होईल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मागेल त्याला काजू कलमे, फार्मर कप स्पर्धा, भाऊसाहेब फुंडकर योजना यांविषयी माहिती देत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान त्यांनी अजित पाटील यांच्या नाचणी उत्पादन क्षेत्राला भेट दिली. उन्हाळी नाचणीचे उत्पादन वाढवून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. नाचणीसारख्या पौष्टिक पिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी आर. आर. चव्हाण, सहायक कृषी अधिकारी एस. डी. मुळे, कृषी सेवक टी. व्ही. वांद्रे, एस. ए. तांबे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















