कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात तीन आठवड्यांत १०५ एकरातील ऊस जळाला, शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या उसाचा दर, साखर व मोलॅसिस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. साखर टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांचा प्रभाव लक्षात घेता अद्याप तरी कारखाने सुरू झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन आठवड्यांत वीज कोसळून तसेच शॉर्टसर्किटने शिरोळ तालुक्यातील सुमारे १०५ एकरांतील ऊस जळाला आहे. सध्या कारखाने बंद असल्याने या जळालेल्या उसाचे करायचे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जळालेला ऊस शेतातच वाळून जाण्याची भीती निर्माण झाली जळालेल्या उसामुळे शेतकऱ्यांना सुमारे दीड कोटीहून अधिक नुकसान सोसावे लागत आहे.

सध्या सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनामुळे आणखीन काही दिवस तरी कारखाने सुरू होतील, असे चित्र नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून विविध गावांमध्ये वीज कोसळून तसेच शॉर्टसर्किटने ऊस पेटल्याच्या घटना घडल्या. गळीत हंगाम सुरू असताना अशा घटना घडल्यास दर कमी करून कारखाने ऊस स्वीकारतात. मात्र, कारखाने बंद असल्यामुळे पेटलेला हा ऊस सध्या शेतात तसाच उभा आहे. वीज कोसळून आडसाली ऊस उत्पादकांचे सरासरी एकरी एक ते दीड लाखांचे नुकसान झाले. तर खोडवा उसाचे एकरी ८० हजार ते एक लाखांचे नुकसान होणार आहे. जळालेल्या उसातील साखर उताऱ्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने या उसाचे तत्काळ गाळप होणे आवश्यक आहे. मात्र, कारखाने बंद असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये तातडीने जळालेल्या उसाचे पंचनामे करावेत अशी मागणी केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here