कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून सरकारचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने बुधवारी तात्काळ प्रभावाने ३० सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू केली. देशात साखर उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन देशांतर्गत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवणे आणि पुरेसा साठा उपलब्ध राहावा हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
राजू शेट्टी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, “आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे,” अशा शब्दांत सरकारवर टीका केली.ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवलेला नाही. त्यामुळे साखरेचे दर स्थिर असून कारखान्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दर मिळत असताना कारखान्यांना निर्यातीवर बंदी घालणे हे विरोधाभासी धोरण असल्याचे त्यांनी म्हटले. सरकार स्वतः साखरेचे दर वाढवत नाही आणि निर्यातीवरही बंदी घालते, मग कारखान्यांनी आणि शेतकऱ्यांनी करायचे काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेट्टी यांच्या मते, या परिस्थितीचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे. साखर आणि उपपदार्थांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त हिस्सा मिळावा, ही आमची भूमिका आहे. मात्र साखरेचे दर न वाढल्याने कारखान्यांची आर्थिक स्थितीही कमकुवत झाली आहे. देशभरात सुमारे १२ हजार कोटी रुपयांची ऊस उत्पादकांची देणी थकीत असून, महाराष्ट्रातच जवळपास ३ हजार कोटी रुपयांचे थकबाकी असल्याचा दावा त्यांनी केला.
ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार, उसाचे पैसे १४ दिवसांत न दिल्यास साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात अशा कारवाईची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. शेट्टी यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकार खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन करते, पण दुसरीकडे कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


















