मुंबई: केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. देशातील अग्रगण्य साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. या निर्णयाचा परिणाम राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर तसेच ग्रामीण राजकारणावरही होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी महाराष्ट्रातील साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत 18 लाख टनांनी वाढले आहे. निर्यात हंगाम सुरू असतानाच लागू करण्यात आलेल्या या बंदीमुळे निर्यातीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 4.88 लाख टन साखर कोट्यातील 30 टक्क्यांहून अधिक साखरेची निर्यात थांबली आहे. सहकारी साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, यामुळे साखर कारखान्यांच्या रोकड प्रवाहावर परिणाम होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांमध्ये विलंब होऊ शकतो.
उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ही बंदी अनावश्यक असल्याचा त्यांचा दावा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एकूण 15.8 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली होती, त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा 4.88 लाख टन होता.एका अधिकाऱ्याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले कि, महाराष्ट्रासाठी मंजूर 4.88 लाख टन साखर कोट्यापैकी 3.25 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे किंवा त्यासाठी करार झाले आहेत. या बंदीमुळे मंजूर साखरेपैकी 30 ते 40 टक्के साखर अडकली असून कारखान्यांवर आर्थिक ताण निर्माण होणार आहे.”
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, हंगामाच्या मध्यावर लावलेली ही बंदी देशाच्या साखर निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगाची प्रतिमा खराब करू शकते.या निर्णयावर राजकीय स्तरावरूनही टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) चे अध्यक्ष शरद पवार यांनी या बंदीला महाराष्ट्राच्या सहकारी साखर उद्योगासाठी “आर्थिकदृष्ट्या विनाशकारी” असे संबोधले. साखर कारखान्यांचा “आर्थिक ऱ्हास” टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पवार म्हणाले की, या बंदीमुळे कारखान्यांना शेतकऱ्यांना योग्य आणि लाभदायक दर (एफआरपी) देण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळणार नाही. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे उद्योगाला आर्थिक दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. पण सरकारने तो मार्ग बंद करून कारखान्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे,” असे ते म्हणाले. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर टीका करताना म्हटले कि, “हा अत्यंत दुर्दैवी निर्णय असून राज्य आणि देशाच्या साखर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. निर्यातीमुळे कारखान्यांना उत्पन्न आणि रोकड मिळते. आता निर्यात करारांचे काय होणार?”


















