साखर उद्योगाला धक्का, आंतरराष्ट्रीय दर तेजीत असतानाच भारताकडून निर्यात बंदी लागू

कोल्हापूर : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने साखर निर्यातीवर बंदी लागू केली. ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले आहेत. निर्यातीमुळे चांगला दर मिळण्याची अपेक्षा असताना हा निर्णय घेतल्याने साखर कारखानदारांसह शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. केंद्राच्या निर्णयानुसार, कच्चा साखरेबरोबरच पांढरी, शुद्ध अशी कोणत्याच प्रकारची साखर निर्यात करता येणार नाही. फक्त युरोप, अमेरिका यांना टीआरक्यू कोट्यांतर्गत होणारी निर्यात या बंदीतून वगळण्यात आली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. न्यू यॉर्कमध्ये कच्चा साखरेचे वायदे दोन टक्क्यांनी, तर लंडनमध्ये पांढऱ्या साखरेचे वायदे तीन टक्क्यांहून अधिक वाढले. तर देशांतर्गत बाजारात क्विंटलमागे १०० रुपयांची घसरण झाली.

केंद्राने सुरुवातीला १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. नंतर पाच लाख टनांचा अतिरिक्त साठा निर्यातीसाठी खुला केला. त्यापैकी केवळ ८७ हजार ५८७ टनांना मंजुरी देण्यात आली. एकूण १६ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. यापैकी ७.५ ते ८ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा होती. पण या आदेशामुळे ही आशा मावळली आहे. निर्यात बंदीच्या निर्णयाची साखर उद्योग व शेतकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय मुर्खपणाचा आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत असेल, तर मग कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये? स्वतः दर वाढवत नाही आणि कारखान्यांच्या साखर निर्यातीवर बंदी घालता, यामागे केंद्र सरकारचा तर्क काय आहे? देशात ऊस बिलांची १२ हजार कोटींची थकबाकी आहे. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न पडतो. तातडीने निर्यात बंदी उठवावी, साखर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, साखर विक्री मूल्यांमध्ये ठोस वाढ करावी अशी मागणी किसान सभेने केली. किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, जे. पी. गावित, उमेश देशमुख आदींनी केंद्राने याउलट निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांच्या पायात असणाऱ्या बेड्या आणखीन घट्ट केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तर ही चुकीच्या निर्णयांची पुनरावृत्ती आहे. अशा चुकीच्या निर्णयाचा फटका गेल्या अनेक वर्षांत साखर उद्योगाला बसला आहे अशी टीका राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here