कोल्हापूर : वाणिज्य मंत्रालयाने ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात करता येणार नाही, अशी अधिसूचना बुधवारी काढली. केंद्राने १५ लाख टन निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊसमान कमी होण्याचा अंदाज असल्याने त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होईल, असा विचार करून केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर गुरुवारी बंदी घातली. केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) २०१९ पासून वाढवलेला नाही. इतर अन्नधान्याच्या किमतीत दुप्पट, चौपट दरवाढ झाली असताना साखरेच्या दरात मात्र मागील दहा वर्षात फारशी वाढ झालेली नाही. देशांतर्गत बाजारात साखरेचा दर किलोला ३८ रुपये आहे. मग, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी कशी द्यायची, अशी विचारणा साखर उद्योगातून होत आहे.
याबाबत साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले की, साखर उत्पादन कमी होईल, या भीतीपोटी केंद्र सरकारचा साखर निर्यात बंदीचा निर्णय साखर कारखानदारीच्या अडचणीत भर घालणारा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकला त्याचा फटका जास्त बसेल. कारण या राज्यांची निर्यात जास्त असते. सध्याच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६ लाख टनाचा होता. ते सारेच ठप्प झाले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार साखरेची किमान खरेदी किंमत वाढवून देईना आणि चार चांगले पैसे मिळतात म्हणून निर्यात करतो म्हटले तर त्यावरही आता बंदी आणली. साखर कारखानदारीचे कंबरडे मोडणारा हा निर्णय आहे. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, केद्राने एफआरपी वाढवली. पण ती देण्यासाठी साखरेला चांगला दर मिळायला हवा. तो दर मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे काही होत नाही. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कारखानदारीच्या अडचणी अधिक वाढतील. एफआरपी देणार कशी ? हा प्रश्न आहे.


















