कोल्हापूर : केंद्र सरकारने यंदाही उसाची एफआरपी वाढवली आहे. साखर कारखान्यांचा व्यवस्थापन खर्च वाढला आहे. कामगारांचे पगार वाढले आहेत. इतर खर्चातही वाढ झाली आहे. एकूणचा साखर कारखानदारी अडचणीत आहे. अशा टप्प्यात साखर निर्यात बंद झाल्यावर पुन्हा गंभीर परिणाम होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, साखरेचे किमान भाव (एमएसपी) वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारने इथेनॉलचे दरही वाढायला हवेत. साखर कारखानदारी आर्थिक संकटात आहे. अशातच साखरेची निर्यात बंद केली गेली. त्यामुळे पुन्हा कारखानदारी धोक्यात येणार आहे. जर तत्काळ उपाययोजना झाली नाही तर पुढील हंगामात निम्मे कारखाने सुरू होणार नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय सहकार मंत्र्यांकडे राज्य सरकार पाठपुरावा करेल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कामकाज सक्षमपणे सुरू आहे. अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी चर्चा झाली होती. त्यामुळे आता अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटत असतील तर त्यामध्ये काहीही गैर नाही.


















