कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव हे प्रति टन ४५५ डॉलर आहेत. यामध्ये निर्यात खर्च वजा केल्यास हा दर ४१० डॉलर होतो. देशांतर्गत बाजारात कारखान्यांना ४१ हजार ते ४२ हजार रुपये प्रति टन दर मिळत आहे. त्यामुळे साखर निर्यात अतिशय कमी प्रमाणात केली जात होती. आता केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पैसे देताना अडचण येईल, असा बाऊ करायला कारखान्यांनी सुरूवात केली आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केले.
याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने साखर निर्यातीस बंदी घातल्याने वाढत्या साखर दरावर अगदी किरकोळ फरक पडणार आहे. साखर दर कमी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल, अशी परिस्थिती नाही. देशांतर्गत बाजारपेठेत दर अधिक असल्याने साखर निर्यात जवळपास बंदच होती. त्यामुळे कारखान्यांनी निर्यात बंदीचा बाऊ करू नये. केंद्र सरकार साखरेचा किमान हमीभावात वाढ करत नसल्याने उसाची एफआरपी देताना अडचणी येतात, असे कारखानदार वारंवार सांगतात. पण, सध्या साखरेच्या किमान हमीभावापेक्षा प्रति क्विंटल १ हजार रुपये अधिक मिळतो, असे चुडमुंगे यांनी पत्रकात म्हटले आहे.


















