कोल्हापूर : साखरेच्या हमीभावात अपेक्षित वाढ न होणे आणि दुसरीकडे साखर उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, ऊस उत्पादकांना वेळेत पैसे देण्यासाठी कारखान्यांना महिनाभर उत्पादित झालेली साखर विकून त्यातून अवघ्या १५ दिवसांच्या उसाचे बिल अदा करावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती अशीच कायम राहिल्यास हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात गाळप झालेल्या उसाची बिले देताना कारखान्यांची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.
चालू गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले होते. दोन दिवस चाललेल्या आंदोलनानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात बैठक झाली. त्यापूर्वी राजू शेट्टी यांनी प्रतिटन ४२०० रुपये दर स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. त्यानुसार पहिली उचल एकरकमी प्रतिटन ३९०० रुपये, त्यानंतर आणखी १०० रुपये आणि साखरेचे दर स्थिर राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. संघटनेनेही हा निर्णय मान्य केल्यानंतर गळीत हंगाम सुरू झाला.
मात्र, प्रत्यक्षात ठरलेला दर देताना कारखान्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. खुल्या बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल ६२०० रुपयांपर्यंत असला, तरी कारखान्यांना प्रत्यक्षात ५४०० ते ५७०० रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विकावी लागत आहे. दुसरीकडे, राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३७०० रुपयांवरून ४२०० रुपये केले आहे. मात्र, या रकमेतून कर्जाचे हप्ते आणि ऊस तोडणी-ओढणीचा खर्च वजा केल्यानंतर एफआरपीसाठी प्रतिटन केवळ २८३० रुपये उपलब्ध होत आहेत.
अशा परिस्थितीत पहिली उचल प्रतिटन ३९०० रुपये देणेही कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठीच प्रतिटन सुमारे ११०० रुपयांची तूट भासत असताना, त्यानंतरचे उर्वरित ३०० रुपये देण्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर निधी उभारण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आर्थिक पेचातून मार्ग काढण्यासाठी कारखान्यांनी महिनाभर उत्पादित झालेली साखर विक्री करून मिळणाऱ्या रकमेतून १५ दिवसांच्या ऊस बिलाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. कायद्यानुसार गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी साखर विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवरच कारखान्यांची मदार आहे.
यंदाचा गळीत हंगाम जेमतेम १०० ते ११० दिवस चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत बिले मिळण्याची शक्यता असली, तरी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ऊस तुटलेल्या शेतकऱ्यांना बिलासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. साखरेच्या दरातील अस्थिरता, वाढता उत्पादन खर्च आणि उसाच्या दराची बांधिलकी यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक कसरत अधिकच वाढली आहे.


















