हैदराबाद : भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवे स्वरूप देण्याच्या उद्देशाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी संयुक्तपणे ‘इंडिया-ऑस्ट्रेलिया स्मार्ट फार्म नेटवर्क’ची स्थापना केली आहे. 2047 पर्यंत हवामान-स्मार्ट, डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आणि मानवरहित कृषी प्रणाली विकसित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची औपचारिक घोषणा हैदराबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ येथे करण्यात आली. हा प्रकल्प चार्ल्स स्टर्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लस्टर, रिसर्च अँड इनोव्हेशन सर्कल ऑफ हैदराबाद आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान व नवकल्पनांचा दुवा म्हणून या नेटवर्ककडे पाहिले जात असून, अचूक शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी प्रणाली, हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान, कृषी रोबोटिक्स आणि शाश्वत ग्रामीण विकास यांना चालना देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमामागील प्रमुख विचार म्हणजे बदलत्या हवामान परिस्थिती, नैसर्गिक संसाधनांची कमतरता आणि अन्नसुरक्षेवरील वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेती पद्धती पुरेशा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान चाचण्या, स्टार्टअप्सना प्रोत्साहन, तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण आणि संस्थात्मक ज्ञानाची देवाणघेवाण यासाठी एकात्मिक व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न या नेटवर्कद्वारे केला जाणार आहे.
भारतामधील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांनी या उपक्रमाला द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले. हवामान बदल आणि अन्नसुरक्षेच्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित कृषी प्रणाली उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान अल्दास जनाय्या यांनी भारत 2047 पर्यंत मानवरहित शेतीचे उद्दिष्ट साध्य करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. स्मार्ट तंत्रज्ञान, स्वयंचलित प्रणाली आणि डेटा-आधारित कृषी व्यवस्थापनामुळे भविष्यातील शेतीत मोठे परिवर्तन होईल, असे त्यांनी सांगितले.


















