नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊसशेती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच साखर उताऱ्यातही सुधारणा होत आहे. तसेच साखर कारखाने अधिक काळ पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या उसाची उपलब्धता आणि उत्पादनाचा अचूक अंदाज घेणे शक्य झाले आहे. परिणामी साखर कारखान्यांच्या एकूण कार्यक्षमतेत मोठी सुधारणा होत असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष तथा बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी केले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित ‘सहकारी साखर उद्योग परिषद २०२६’ मध्ये सोमवारी (२१ सप्टेंबर) ते बोलत होते. त्यांच्या भाषणानंतर कृषी विकास प्रतिष्ठानच्या चमूने ऊसशेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पाचे सादरीकरण केले. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या या परिषदेत ‘काटेकोर शेती’ (प्रिसिजन फार्मिंग) या विषयावरील तांत्रिक चर्चासत्रात हे सादरीकरण झाले. एआयच्या वापरामुळे ऊसशेतीमध्ये झालेले बदल, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि साखर उद्योगाच्या कार्यक्षमतेत होणारी सुधारणा याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
१० हजार शेतांवर क्षेत्रीय चाचण्या
कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे डॉ. योगेश फाटक आणि जॉन कुरुविला यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती सादर केली. एआयच्या मदतीने ऊस उत्पादकता वाढविणे, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि साखर कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या शेतांवर क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सुमारे तीन लाख शेतकऱ्यांपर्यंत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले असून, १० हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान केवळ ऊस पिकापुरते मर्यादित नसून गहू, तांदूळ, सोयाबीन, केळी, कांदा आणि हळद यांसह २५ हून अधिक पिकांसाठी वापरले जात असल्याचे सांगण्यात आले.
मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठाचे सहकार्य
कृषी विकास प्रतिष्ठानच्या या प्रकल्पाला मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्स्फर्ड विद्यापीठाचे सहकार्य लाभले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत तिन्ही संस्थांनी मिळून या प्रकल्पात सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बारामती येथे मायक्रोसॉफ्ट फार्मव्हाइब्जचे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविणे आणि साखर उद्योगाची कार्यक्षमता सुधारणे, हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख उद्देश असल्याचे सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले.
प्रकल्पाचे ठळक निष्कर्ष –
खते व कीटकनाशकांच्या वापरात ३० ते ४० टक्के घट.
पाण्याची किमान ४० टक्के बचत, म्हणजेच हेक्टरी सुमारे १.२ कोटी लिटर पाण्याची बचत.
ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ, तर ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ प्रात्यक्षिक क्षेत्रात ६० टक्क्यांपर्यंत वाढ.
साखर उताऱ्यात ०.५ ते २ टक्के सुधारणा.
ऊस पीक कालावधी १४ महिन्यांवरून १२ महिन्यांपर्यंत कमी करणे शक्य.
आयओटी उपकरणे, उपग्रह प्रतिमा आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बात दरवर्षी ०.२५ ने वाढ.
उपग्रह प्रतिमा आणि ग्राउंड-ट्रुथ डेटाच्या आधारे उतारा व उत्पादनाचे अंदाज ९८ टक्क्यांहून अधिक अचूक


















