सातारा : कृष्णा साखर कारखाना निवडणूक, पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल

सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले. दिवसभरात २२ अर्जाची विक्री झाली आहे. विद्यामान संचालक दयानंद पाटील यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमधून काले कार्वे गटातून, तर रेठरे हरणाक्ष गटातून संस्थापक पॅनेलतर्फे पोपट कदम यांचा अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी ही माहिती दिली.

‘कृष्णा’च्या निवडणुकीत ५० हजार २५२ सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आहे. संचालक मंडळासाठी २१ जूनला मतदान, तर २३ जूनला मतमोजणी होत आहे. सातारा, सांगलीतील पाच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात विस्तारलेल्या ‘कृष्णा’ कारखान्याची निवडणूक नेहमीच चर्चेची राहिली आहे. यावेळीही त्याकडे लक्ष लागून आहे. सत्ताधारी भोसले गटाने तयारी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

येथील मार्केट यार्डमधील उपनिबंधक कार्यालयाशेजारील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी सांगितले. पहिल्या दिवशी २२ अर्जाची विक्री झाली. विद्यमान संचालकांपैकी दयानंद पाटील यांचा अर्ज दाखल झाला. काले-कार्वे उत्पादक गटात भोसले गटाकडून त्यांनी अर्ज दाखल केला. सांगली जिल्ह्यातील संस्थापक पॅनेलचे पोपट कदम यांनी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून अर्ज दाखल केला.

वाळव्यात उमेदवारीसाठी होणार जोरदार रस्सीखेच…

कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात विस्तारले आहे. खानापूर तालुक्यातीलही काही गावांत ‘कृष्णा’चे सभासद आहेत. सर्वाधिक सभासद संख्या कराड तालुक्यात आहे. कारखान्याचे सध्या मतदार ५० हजार २५२ आहेत, तर २१ संचालक सध्या सत्ताधारी भोसले गटाकडून वाळवा तालुक्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या गटाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या गटाकडून उमेदवारी मिळाली नाही तर विरोधी गटात जाऊन उमेदवारी मिळवण्याचीही काहींनी तयारी ठेवली आहे.

कारखान्यावर दहा वर्षे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची सत्ता आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कृष्णा बँकेचे अध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखान्याच्या ३७ वर्षांच्या इतिहासातील निवडणुकांतील मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत २०२१ मध्ये कारखान्यावर सत्ताधारी पॅनेलने प्रथमच सुमारे १० हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते या संस्थापक पॅनेलचे नेतृत्व करणार आहेत. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिलेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.

नेत्यांच्या भूमिका ठरणार महत्त्वाच्या…

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश नसतो. त्यामुळे वाळवा शिराळा, कडेगाव तालुक्यातील नेतेमंडळी कोणाच्या पाठीमागे राहतात, त्यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून असते. कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे आ. विश्वजित कदम, शिराळ्याचे माज आमदार मानसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्म्राट महाडिक, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील या नेत्यांची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दहा वर्षांत कारखान्याचे केलेले विस्तारीकरण, चांगला ऊस दर ऊसतोडीतील सुसूत्रता, पाणी योजनांचे आधुनिकीकरण, सभासद, कामगारांचे प्रश्न मार्गी, या मुद्द्यांवर पुन्हा एकद सहकार पॅनेल निवडणुकील सामोरे जाण्याच्या तयारीत आहे; तर विरोधी संस्थापक पॅनेलनेही नवीन सभासदांची नोंदणी व अपात्र सभासदांचा प्रश्न, घराणेशाही एकाधिकारशाही हे मुद्दे घेऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here