पुणे : जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांच्या सिंचन नियोजन अभावामुळे निरा डाव्या कालव्यावरील फाटा क्र. २२ चे आवर्तन दीड महिना लांबले. परिणामी या परिसरातील ऊस पिकाची चिपाडे झाली आहेत. शेतातील उभी पिके कशी जगवावीत, या विवंचनेत शेतकरी आहेत. दरम्यान, वाढत्या तापमानाचा विचार करून जलसंपदा विभागाने पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. निरा डाव्या कालव्यावरील असणाऱ्या फाटा क्र. २२ वर सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.
विशेषतः माळेगाव कारखान्याचे मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासद असून, बहुतांशी शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले आहे. मात्र, वाढत्या तापमानाने विहीर, कुपनलिका या जलस्रोतांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याअभावी येथील उसाचे पीक जळू लागले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच पुढील गाळप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चारा पिकेही पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग २२ फाट्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, जलसंपदा विभागाच्या नियोजन अभावामुळे आवर्तन लांबले आहे. सध्याचे तापमान पाहत या फाट्याला आवर्तन सोडणे गरजेचे होते. महिन्यांनी पाणी सोडून काही उपयोग होणार नाही, अशी खंत शेतकरी प्रवीण वाघमोडे, सुभाष तावरे, राजेंद्र भोसले, भुजंगराव खोमणे, सूर्यकांत मदने, अमोल गोफणे, बलदेव धंगेकर आदींनी केली आहे. सिंचन नियमानुसार १८ फाट्याचे सिंचन उरकून लवकर २२ फाट्याला आवर्तन सोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जलसंपदा विभागाचे उपअभियंता ए. टी. नारायणकर यांनी स्पष्ट केले.


















