सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. सुमारे दोन हजार सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत कारखान्याचा हुपरीच्या कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबतचा भागीदारी करार रद्द करणे आणि ८ सप्टेंबर २०२० च्या निर्णयाप्रमाणे स्वारस्य अभिव्यक्तीनुसार कारखाना, अर्कशाळा, देशी व विदेश मद्य विभाग सहकारी अथवा खासगी कारखान्यास सहयोगी तत्त्वावर चालवण्यास देण्याविषयी निर्णय घेण्यात आले. यावेळी कारखाना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यास देण्याचा ठराव करण्यात आला. विरोधकांनी याला आक्षेप घेतल्याने सभेत वादावादी झाली.
श्रीराम साखर कारखाना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यास देण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला गेला. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवरुपराजे खर्डेकर, अॅड, नरसिंह निकम यांनी जवाहर कारखान्यासोबतचा करार मध्येच ब्रेक केल्याने कारखाना, सभासदांचे नुकसान झाल्याचे म्हटले. कारखान्याने मंत्री समिती व कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या लेखी सूचनांचे पालन केले नसल्याचे सांगत ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधक हा प्रश्न उपस्थित करून केवळ सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. सत्यजितराजे नाईक कारखान्याचे माजी अध्यक्ष नितीन भोसले, धनंजय पवार, रेश्मा भोसले, सचिन सूर्यवंशी-बेडके, जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम, महेंद्र सूर्यवंशी बेडके आदी उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्ताविक केले. सुखदेव बेलदार यांनी आभार मानले.


















