नाशिक : साखर निर्यातबंदीच्या चुकीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनेचा लढा देण्याचा निर्धार

नाशिक : केंद्र सरकारने लागू केलेल्या साखर निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपी दराने ऊस बिले येणे बाकी आहे. साखर निर्यातबंदी झाल्यास कारखान्यांकडे अतिरिक्त साखर शिल्लक राहील. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा स्वर्गीय शरद जोशी प्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने दिला आहे. या निर्णयाचा दूरगामी परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे म्हणाले की, केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. या निर्णयाचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसेल. उसाचे दर कोसळतील. एका बाजूला रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढत आहे, त्या तुलनेत मात्र उसाचे भाव न वाढल्याने शेतकऱ्यांवर दूरगामी परिणाम होतील. केंद्र सरकारने जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर व देशांतर्गत होणाऱ्या परिणामांवर उपाय योजनेसाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यात करता येणार नाही. मात्र यातून देशात साखरेचा अतिरिक्त साठा तयार होऊन साखरेचे दर घसरण्याची भीती आहे. सरकारने साखर निर्यातबंदीचा घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संघटनेकडून होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here