महाराष्ट्र : राज्यातील १२७ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी, शेतकऱ्यांचे ९३४ कोटी अद्याप थकीत

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये सहभागी असलेल्या १२७ कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली आहे. तर १५ मेअखेरच्या थकीत एफआरपीच्या अहवालानुसार, ८३ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ९३४ कोटी रुपये देणे बाकी आहे. साखर आयुक्तालयात थकीत एफआरपी रक्कम असलेल्या ३९ कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिनांक ११ मे रोजी घेतली होती. त्यावेळी ९६ साखर कारखान्यांकडे थकीत एफआरपीचे सुमारे १,३०३ कोटी रुपये बाकी होते. त्यानंतर गेल्या पंधरवड्यात साखर कारखान्यांनी ३६९ कोटी रुपयांच्या अधिक ऊस बिलांचे वितरण केले आहे.

राज्याचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एप्रिलअखेर १० कोटी ४५ लाख ६३ हजार टनांइतके ऊस गाळप झाले. ऊसतोडणी व वाहतूक खर्चासह शेतकऱ्यांना देय एफआरपीची रक्कम ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३९ हजार ५१२ कोटी रुपये जमा केले. ही रक्कम ९७.६९ टक्के आहे. सद्यःस्थितीत ८३ कारखान्यांकडे ९३४ कोटी रुपये थकीत राहिले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी आयुक्तालयाचा पाठपुरावा सुरू आहे. साखर आयुक्तांकडील सुनावणीमध्ये काही कारखान्यांनी थकीत रक्कम देण्यासाठी मुदत मागून घेतली होती. त्यानंतर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३६९ कोटी रुपये जमा केलेले आहेत. शिवाय, १३ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एफआरपीची थकबाकी प्रथमच एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here