यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एफआरपी थकबाकीच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी पसरली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीची रक्कम मिळालेली नसल्याने संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम यांनी संबंधित साखर कारखान्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोफाळी येथील भैरवनाथ शुगर मिल अंतर्गत वसंत सहकारी साखर कारखान्याकडे फेब्रुवारी महिन्यात गाळपासाठी दिलेल्या उसाची सुमारे तीन कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी कारखाना प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत थकीत रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र मुदत संपल्यानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मंगरुळ येथील डेक्कन शुगर मिलकडे उमरखेड आणि हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पैसे रखडल्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले असून खरीप हंगाम तोंडावर असताना त्यांची चिंता वाढली आहे.
या प्रकरणी पहिल्या टप्प्यात पोफाळी येथील भैरवनाथ शुगर मिलसमोर धडक आंदोलन आणि निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंगरुळ येथील डेक्कन शुगर मिलसमोर उपोषण आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. एफआरपीची थकबाकी तातडीने न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.


















