सोलापूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणाऱ्या मशागतीचे दर तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांनी अद्याप उसाची एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नसताना आता वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.सध्या पावसाळ्यापूर्वीची शेती मशागत, नांगरणी आणि रोटाव्हेटरची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र कडक उन्हामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजुरांच्या टंचाईमुळे मजुरीचे दरही वाढले असून, पूर्वी ८ तासांच्या खुरपणीसाठी महिला मजुरांना २५० रुपये मिळत होते, तो दर आता ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पूर आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना आता महागाईचा फटका बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांनीही प्रति एकर मशागतीचे दर वाढवले आहेत. ट्रॅक्टरची दुरुस्ती, देखभाल आणि इंधन खर्च वाढल्याने दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. मात्र या वाढीचा थेट आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. उसाची थकीत बिले मिळालेली नसतानाच खरीप पेरणीसाठी बियाणे, मशागत आणि इतर खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना कर्ज किंवा उसनवारीचा आधार घ्यावा लागत आहे. नांगरणीपासून पेरणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रति एकर २०० ते ३०० रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक खर्चिक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


















