मुरादाबाद : वन विभागाने जिल्ह्यात नुकतेच दोन बिबटे पकडले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांकडून हल्ले वाढले आहेत. उसाची शेते बिबट्यांसाठी फार पूर्वीपासून एक सुरक्षित आश्रयस्थान राहिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील काठ, दिलारी, भोजपूर आणि ठाकूरद्वारा येथील उसाच्या शेतात १०० हून अधिक बिबटे असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे. पावसाळ्यात, बिबट्या उसाच्या शेतातील ओली माती टाळतात आणि कोरड्या, सुरक्षित अधिवासाच्या शोधात असतात. त्यामुळे, बिबट्यांच्या मानवी वस्त्यांजवळ येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मादी बिबट्या पिल्लांना जन्म देण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी उसाच्या शेतांचा वापर करतात. उसाच्या शेतांमुळे मिळणाऱ्या पुरेशा संरक्षणामुळे, विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात बिबट्यांची उपस्थिती वाढते असे भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, आता पावसाबरोबर बिबट्यांचा धोका आणखी वाढेल. त्यांच्याकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने मंगळवारी पहाटे ५ वाजता ठाकूरद्वारात एक बिबट्या पकडला, तर दिलारी परिसरातील दोन ठिकाणी बिबट्यांनी हल्ला करून दोन तरुणांना जखमी केले. वन विभागाने दिलारी जिल्ह्यातील मलकापूर सेमली गावात एका तरुणावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर, पूर्वी लावलेल्या पिंजऱ्याच्या जागी दुसरा पिंजरा बसवला. तर ठाकूरद्वारा जिल्ह्यातील लालपूर पिपलसाना, रायभूड आणि बहापूर बलिया यांसह विविध गावांमध्ये बिबट्या पकडण्याची मोहीम सुरू आहे. वन विभागाने आतापर्यंत कांत, दिलारी आणि ठाकूरद्वारा येथे २५ हून अधिक पिंजरे बसवले आहेत. मुरादाबादसोबतच, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प, बिजनौर, संभल आणि रामपूर येथील पथकेही उसाच्या शेतांमधील बिबट्यांना पकडण्याच्या कामात गुंतलेली आहेत. विभागाने मुरादाबादमधील बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव, त्यांची सुटका आणि भविष्यातील धोरणांबाबत तज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत. मात्र, बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी आपल्या शेतात जाणेही मुश्किल झाले आहे. अनेक शेतकरी उसाच्या फडात जाण्यास घाबरत आहेत.


















