साखर उद्योगातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत प्रयत्न करू : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून उद्योगासमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शनिवारी सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळासोबत झालेल्या चर्चेत साखर उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कारखान्याची निवडणूक येत्या सप्टेंबरमध्ये होणार असल्याने सुनेत्रा पवार यांच्या भेटीकडे विशेष लक्ष लागले होते. भेटीदरम्यान त्यांनी कारखान्याची आर्थिक आणि तांत्रिक स्थिती जाणून घेतली. तसेच डिस्टिलरी विस्तार प्रकल्प, नवीन बॉयलर उभारणी आणि इतर विकासकामांचा आढावाही घेतला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली. साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल ४२०० रुपये करण्यात यावा, अशी त्यांनी भूमिका मांडली. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प तोट्यात चालत असल्याने प्रतियुनिट १.५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साखर उद्योग, कामगार आणि कारखान्यांसमोरील प्रश्नांबाबत शासनस्तरावर निश्चित पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. या भेटीप्रसंगी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव तसेच संभाजी होळकर, संग्राम सोरटे, शैलेश रासकर, बाळासाहेब कामथे, अभिजित काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here