पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ हंगामातील ऊस लागवड धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मे पासून हे धोरण राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. याअंतर्गत धोरणानुसार, २५ मे ते ३१ मार्च या कालावधीत कोएम. ०२६५ आणि ३० एप्रिलपर्यंत को ८६०३२ या जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय व्हीएसआय ०८००५, एमएस १०००१, फुले ९०५७ आणि कोव्हीएसआय १८१२१ यांसह अन्य सुधारित जातींच्या लागवडीसाठीही विविध कालमर्यादा निश्चित केल्या आहेत. तर खासगी लागवड करणाऱ्यांनी चार दिवसांत नोंद करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी शेती कार्यालयात बेणे मागणी नोंदवावी. आतापर्यंत केलेल्या लागवडीची नोंद २५ मे हीच धरली जाईल, असे ते म्हणाले.
उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, हुमणी कीड नियंत्रणासाठी जून २०२६ अखेरपर्यंत भुंगेरे गोळा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रवेश शुल्क १०० रुपये डिसेंबरअखेर भरुन नाव नोंदणी करावी. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये दत्तात्रेय वळसे-पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० या ऊस विकास योजनेंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरूप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, ईपीएन आदींचा पुरवठा करण्यात येईल.


















