कोल्हापूर : आगामी गळीत हंगामात ओलम शुगर्सने ८ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. याचबरोबर ऊस उत्पादन वाढीसाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे बिझनेस हेड टी. कन्नन यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे ओलम शुगर्स मध्ये १७ व्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचा पूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. अधिकाधिक ऊस गाळपासाठी शेतकरी, ऊस वाहतूकदार, कारखाना कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मिल मेकॅनिकल मॅनेजर प्रकाश बाचुळकर यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन झाले. युनिट हेड अशोक दुवा, एचआर मॅनेजर महेश भोसले, प्रोसेस हेड दुर्गेश तोमर यांनीही मार्गदर्शन केले. डिस्टलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असल्याची माहिती डिस्टलरी प्रमुख नरेंद्र रावत यांनी दिली. केन हेड सुधीर पाटील यांनी ८ लाख टन ऊस गाळप कारण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यरत असून ऊस पुरवठा विभाग पूर्णपणे सक्षम आहे, असे सांगितले. नियोजनानुसार उस नोंदणी व तोडणी – वाहतूक करार केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. युनियन अध्यक्ष संतोष गुरव यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, युनियन पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.


















