महाराष्ट्र : राज्यातील सात कारखान्यांवर आरआरसी कारवाई, शेतकऱ्यांची २३३ कोटींची ऊस बिले थकीत

सोलापूर : राज्यात गळीत हंगाम संपुनही अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिले थकवली आहेत. यापैकी सात साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांनी ऊस बिलाचे २३२ कोटी ८० लाख रुपये थकवले आहेत. साखर आयुक्तांनी ऊस बिलाचे पैसे थकवलेल्या ५४ साखर कारखान्यांची सुनावणी घेतली होती. त्यापैकी सात साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्ह्यातील तीन तर धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांकडे ऊस बिलाची थकबाकी आहे. यापैकी गोकुळ शुगरवर शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आरआरसी कारवाई केली असताना नव्याने भीमा टाकळी सिकंदर व संत कुर्मदास या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गोकुळ शुगरकडे सर्वाधिक १३० कोटी ४६ लाख रुपये तर भीमा टाकळी सिकंदर कारखान्याकडे ३० कोटी २३ लाख रुपये, श्री संत कुर्मदास माढा कारखान्याकडे १५ कोटी ९८ लाख रुपये, भीमाशंकर-धाराशिव कारखान्याकडे १२ कोटी २७ लाख रुपये, केदारेश्वर-अहिल्यानगर कारखान्याकडे २२ कोटी ४५ लाख रुपये, एस. जे. शुगरकडे २ कोटी रुपये, सचिन घायाळ छत्रपती संभाजीनगर कारखान्याकडे १९ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जय रणदिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here