पुणे : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटील ऊस पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले. कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऊस उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कारखान्यामार्फत विविध ऊस विकास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वितरण, रासायनिक व द्रवरूप जीवाणू खतांचा पुरवठा, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनासाठी पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना तसेच व्हीएसआयचे मल्टी मायक्रोन्युट्रीएंट, मल्टी मॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक ॲसिड, वसंत ऊर्जा आणि जैविक कीटकनाशकांचा पुरवठा केला जाणार आहे.
ऊस पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत १०० रुपये प्रवेश शुल्क भरून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेअंतर्गत ऊस पिकातील हुमणी कीडीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्याकडून प्रतिकिलो ३०० रुपये दराने जून २०२६ अखेरपर्यंत खरेदी केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कीड नियंत्रण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड करून कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


















