धाराशिव : जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात २०२६-२७ च्या तृतीय गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २५) मिल रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याने चाचणी गळीत हंगामापासून सलग तीन वर्षे शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर अदा करून विश्वास संपादन केला आहे. कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पंधरवडा संपल्यानंतर दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला अदा करण्यात आले असून, पुढेही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
आगीमी गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून एक लाख ५० हजार टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तोडणी-वाहतूक करार पूर्ण करण्यात आले असून, संबंधित ठेकेदारांना पहिला हप्ता देखील देण्यात आला आहे. एक ऑक्टोबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करून कारखाना सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी, अशा सूचना अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चीफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, विजय वाघे, प्रवीण पाटील, सुमित मोरे, अजय गाडे, सुधाकर खोत, परचेस अधिकारी रवी जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, लेबर ऑफिसर शुभम सावंत, राजाभाऊ केवळराम, खयुम मुलानी यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.


















