जालना : स्थानिक कारखान्यांकडून उशिरा होणाऱ्या गाळपाची स्थिती पाहता अंबड, घनसावंगी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या बाहेरच्या जिल्ह्यातील जवळपास दहा ते बारा साखर कारखान्यांना ऊस पाठवला. मात्र, महिना-दोन महिने उलटून गेले तरी अनेक शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. सध्या खरिपाचा हंगाम तोंडावर आला असून, बियाणे, खते आणि मशागतीसाठी पैशांची अत्यंत गरज असतानाच ही हक्काची रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दोन्ही तालुक्यांत जवळपास ३० हजार मेट्रिक टन उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे लवकर ऊस गाळप व्हावा या आशेने शेतकऱ्यांनी जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांना ऊस दिला. मात्र, आता पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि संबंधित कारखान्यांना थकीत बिले व्याजासह देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. परजिल्ह्यातील कारखाने असल्याने स्थानिक प्रशासनाचा त्यांच्यावर थेट अंकुश राहत नाही, याचाच गैरफायदा काही कारखानदार घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. मात्र, गंगामाई, ओंकारेश्वर, गजानन, संत एकनाथ, ओंकार शुगर या इतर साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नाहीत. याविषयी घनसांगवी शेतकरी संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर उढाण म्हणाले की, जर लवकर पैसे मिळाले नाहीत तर संबंधित कारखान्यांच्या कार्यालयावर आणि साखर उपसंचालक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. दहिगव्हाण बुद्रूक येथील शेतकरी श्रीहरी नाईकवाडे म्हणाले की, ऊस जिल्ह्याबाहेरील कारखान्याला ऊस गेला असला, तरी कायद्यानुसार त्याचे पैसे व्याजासह मिळणे हा शेतकऱ्याचा अधिकार आहे.


















