छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, तसेच गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस बिले अद्याप मिळालेली नाहीत. गाळप हंगाम संपून तीन महिने उलटले तरीही श्री एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडक देत दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तेथेही ठोस आश्वासन न मिळाल्याने सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. रयत क्रांती संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल बोबडे, छत्रपती संभाजीनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे, पवन शिसोदे यांच्यासह शेतकऱ्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी विभागीय आयुक्तांसह प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश केला. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने आंदोलनकर्त्यांना पत्राद्वारे आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. साखर आयुक्तांनी २२ मे रोजी आरआरसी आदेश जारी करून मे. सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., कारखान्याविरुद्ध ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कारखान्याकडे वर्ष २०२५-२६ हंगामातील १९४९.२७लाख रुपयांची एफआरपी थकीत असून, त्यावर १५ टक्के व्याज आकारले आहे. ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस आदी उत्पादनांची विक्री करून वसूल करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. मात्र, ऊस बिले देण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. खरीप हंगाम आला असून मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश फी भरायची आहे. काहींकडे रोजचा खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत, अशी अवस्था असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) भारती ठाकूर यांना श्री एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.


















