सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगरकडे थकीत असलेल्या ऊस बिलप्रश्नी सोमवारी तुळजापूर, अक्कलकोट तसेच इतर भागांतील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात तुळजापूर, अक्कलकोट तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील सुमारे पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान तेथेच शेतकऱ्यांनी जेवणासाठी चूल मांडली. आंदोलनादरम्यान शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांनी विविध घोषवाक्ये लिहिलेले फलक हातात घेतले होते. त्यावर ‘हक्काचा पैसा मिळालाच पाहिजे’, ‘ऊस बिल तत्काळ द्या’, ‘सरकारने लक्ष घालावे’, ‘कारखानदार तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशा घोषणा लिहिल्या होत्या. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. काहीजण लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन हंगामात शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे हे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारखाना प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. शेतकऱ्यांना घरासाठी लागणारा किराणा उधारीवर मिळत नाही. आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हे शासनाने सांगावे. शासनाने या प्रकरणात मध्यस्थी करून थकीत ऊस बिल मिळवून द्यावे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. आमच्या मुलाबाळांची लग्ने कशी करायची, हा प्रश्न आमच्यासमोर आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनात काही तरुण शेतकरी आपल्या लहान मुलांना खांद्यावर व कडेवर घेऊन सहभागी झाले होते. जोपर्यंत कारखाना आमचे ऊस बिल देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


















