पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १ जूनपासून ऊस लागवड धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली. कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. गळीत हंगाम २०२७-२८ साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादकांना १ जूनपासून उपलब्धतेनुसार ऊस बेणे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बाराही महिने ऊस लागवड करता येईल. तसेच ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी व्हीएसआय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी पाठविले जाईल. तसेच प्रति एकरी १०० ते ११० मेट्रिक टन आणि त्यापेक्षा अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
कारखान्याच्यावतीने आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट हा कालावधी आहे. पूर्वहंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान तर सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२६ ते मे २०२७ अखेरपर्यंत लागवड करता येईल. आडसालीसाठी को-८६०३२, कोएम -०२६५, फुले ऊस-१५०१२ व फुले ऊस-१५०२६ या जातींची लागवड करता येईल. पूर्वहंगामी लागवडींमध्ये को ८६०३२, कोएम -०२६५, फुले ऊस-१५०१२, कोव्हीएसआय-१८१२१, फुले ऊस-११०८२, फुले ऊस-१५००६, फुले ऊस-१३००७, को-९०५७, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय-४३४, कोव्हीएसआय ०३१०२ आणि एम.एस.-१०००१ या ऊस जातींच्या लागवडीस मान्यता देण्यात आली आहे. तर सुरू हंगामासाठी वरील ऊस जातींच्या लागवडीस परवानगी असून जानेवारी २०२७ पर्यंत को.एम.-०२६५ या जातीच्या लागवडीस मुदत देण्यात आली आहे. चेअरमन शेरकर यांनी सांगितले की, कारखान्यामार्फत उधारी तत्वावर ऊस बेणे, दर्जेदार ऊस रोपे, जीवाणू खते, ताग बियाणे, ठिबक सिंचन योजना, मल्टिमायक्रोन्युट्रिएंट, मल्टिमॅक्रोन्युट्रिएंट, ह्युमिक सिड, वसंत ऊर्जा तसेच ईपीएनसारख्या जैविक कीडनाशकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १ श्री विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रिय खतही माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे.


















