सांगली : “वर्ष २०२६ मध्ये ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने ऊस पिकासाठी आवश्यक उपाययोजना व पाण्याचे योग्य नियोजन करावे,” असे मत क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी व्यक्त केले.अंकलखोप येथे कारखान्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक शीतल बिरनाळे होत्या.जाधव म्हणाले, “अल् निनो’ ही नैसर्गिक घटना असून, यंदा तिच्या प्रभावामुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऊस लागवडकरताना योग्य नियोजन आणि पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे.”
ते म्हणाले “ऊस लागवडीसाठी अधिक रुंदीच्या सऱ्या काढणे, ऊस आठ ते दहा कांड्यांवर आल्यानंतर वाळलेले पाचट सऱ्यांमध्ये आच्छादन म्हणून वापरणे, ठिबक सिंचनाचा अवलंब करणे, पाटपाणी असल्यास मोकाट पाणी न देता सरी धरून पाणी देणे, तसेच एक सरी आड पाणी देणे अशा उपाययोजना केल्यास संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. जयकर मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवी पाटील यांनी आभार मानले. यावेळी सोपान कुराडे, धनंजय सूर्यवंशी, सचिव विशाल सावंत, उमेश जोशी, अनिल हजारे उपस्थित होते.


















