मुंबई: राज्यातील साखर उद्योग सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून अनेक साखर कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, अशी चिंता मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर एका साखर कारखानदाराने “आता सामूहिक आत्महत्येची वेळ आली आहे,” अशी व्यथा मांडल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, साखर उद्योगासह कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. साखर कारखान्यांवर बँकांचे कर्ज, वाढलेला उत्पादन खर्च आणि आर्थिक ताण यामुळे उद्योग अडचणीत सापडला आहे.
साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देणे, कर्जाचे पुनर्गठन (रिस्ट्रक्चरिंग) करणे आणि इथेनॉलचे दर वाढवणे यांसारखे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या बैठकीत सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते आणि सर्वांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे. तसेच, २०२९ च्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि महायुतीतील सर्व पक्ष एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जातील, असे ते म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी माहिती दिली. मतदार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून सप्टेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


















